'दहा रुपये द्या जी'
मांडोदेवी मंदिराच्या पायऱ्या जवळ अतिशय करूणभावाने साधारणपणे पन्नासीतील स्त्रीचे बोल पाठीमागून कानावर आले. मंदिरातील दर्शन आटोपून परतांना मंदिरातील पायथ्याशी मी व भूमिका ने मागे वळून पाहताच ती स्त्री बोलू लागली.
'जेवण करा साठी दहा रुपये पाहिजेत जी..
'बाई आमचे फक्त कपडे चांगले आहेत खिशात काहीच नाही,'
नेहमीप्रमाणे हातापायाने सक्षम असूनही भीक मागून जगणाऱ्या लोकांच्या आलेल्या अनुभवातून माझ्या तोंडून आपसूक हे शब्द बाहेर पडले. तोपर्यंत भूमिकाने आपल्या जवळील दहा रुपयाची नोट तिच्या पुढे केली. पाण्यावर शांतपणे पोहणारे बदक वरून शांत वाटत असले तरी त्यासाठी पाण्याखाली वेगाने होत असलेल्या पायांची हालचाल भूमिकाला दिसली असावी. माझ्याजवळूनही दहा रुपयाची नोट नकळत बाहेर पडून तिच्या हातात स्थिरावली. मिळालेल्या पैशाला गोंजारत ती म्हणाली.
'तीन दिवसापासून येथी आहो बाई, नवरा कामाचा नाही, मारून मारू हाडाचा चुरा केलन, पोरगाही मारते, तंटामुक्ती वाले काहीच करत नाही, मार खाऊन खाऊन कमरेच्या खाली रक्ताची भाकरी झाली आहे बाई.'
माणसाच्या आयुष्य सरळसोट दिसत असले तरी जन्म ते मृत्यूपर्यंतचा हा प्रवास कधीही न संपणारा .....तरीही या जगण्यात कित्येक रहस्य दडलेली असतात.
'बाई काही झालं तरी आपल्याच घरी राहावे, एवढ्या दूर येऊन राहण्यापेक्षा गावातीलच मंदिरात वगैरे राहणं चांगलं. शेवटी ज्याच्या नशीब जे येते ते त्यालाच पहावे लागते.'
विविध रंग ल्यालेली तर कधी स्वतःचा रंग दडवून वेगळ्याच रंगात समोर येणारी..... समोर जे दिसतं ते खरं आहे की त्यामागे आणखी काही वेगळं दडलेलं आहे. असा प्रश्न मनात उभा झाला असतानाच भूमिका विचारू लागली,
'मग येथे कुठं राहता, कुठं खाता.. अंघोळ वगैरे... पांघरायला कपडे आहेत की नाही?'
'येथीच तळ्यात आंघोळ करतो.. दोन-तीन साड्या आहेत...थैल्या मधी, कॅन्टीन मध्ये दहा रुपये दिला की जेवण देते... झोपतो येथीच कोठीतरी.'
आयुष्याची न सुटणारी कोडे पुन्हा पुन्हा सोडवण्याचा चिकाटीने प्रयत्न करत ती बोलली.
आमची जाण्याची वेळ होत आल्याने त्या स्त्रीचा विचार करत करतच परतीचा प्रवास सुरू झाला. ज्या नवऱ्याच्या आधाराने उभे आयुष्य काढावे त्या आधारालाच कीड लागावी.. आणि ज्या आधाराने उभं आयुष्य काढायचे आहे त्या मुलाने ही वाऱ्यावर सोडावे. तेव्हा तिच्याकडून लिहायला सुरुवात होते... जीवनाचे....जगण्याचे...एक नवे पान...ज्यात दुःख ओंजळीत टाकलेलं आहे. अनेक कोडीही समोर ठेवल्या आहेत. हा नमुना माणसांचा क्रूर आणि विक्षिप्त वाटत असला तरी, सगळ्या दुःखांच्या रंगांना पोटात घेऊन पसरलेला असतो....विविध छटांसह.... क्वचित काहिशा उजड छटांसह मानवी आयुष्याला व्यापून राहिलेला असतो.
माझ्या वाचनातला एक आदर्श लेखक म्हणजेच महेश सर..
ReplyDeleteधन्यवाद जी
Delete