Sunday, 2 September 2018

बेफिकीर तरूणांचा प्रतिनिधी- मिथुन

मिथुन...नुकताच बारावी उत्तीर्ण झालेला मुलगा.....पुढे काय करायचे आहे याचा थांगपत्ता नाही... मुक्त विद्यापिठातून पदवी घ्यायची की आय. टी. आय. करून कौशल्य विकसित करून पोट भरायचे यामध्ये गुरफटलेला....दहावीच्या निरोप समारंभात जबरदस्तीने मनोगत व्यक्त करायलं लावलं तर...काँपी केल्याशिवाय पास होणार नाही हे बेधडक सांगणारा.....फेसबुक व व्हाँट्स अप ची स्पेलिंग पण लिहता येणार नाही पण दिवसभर फेसबुक व व व्हाँटस अप वर राहणारा ........काही दिवसाअगोदर अचानक कपडे भरून निघून गेला....कुठं गेला याचा त्याच्या मित्रांना व आईवडिलांना ठावठिकाणा नव्हता...तो नुकताच गावी परतला....त्याच्याशी झालेला संवाद.

कुठं गेला होता रे, मिथुन?

एवढं उच्चारताच मनात काही न ठेवता, तो बोलायला लागला..।

"गावात पाणठेल्यांची तीन चार हजाराच्या वर उधारी....कमाई कवडीची नाही....लोकायचे टोमणे आयकना होत नाही, म्हणून कोठीतरी बाहेर कामधंदा करिन मटलो...थोडं कमवल्यावर सगळ्याचे पैसे देवून देईन.....पहिला तं मोबाईल घेवाचा आहे...आपली जिंदगीच अशी आहे भाऊ..।"

आपला आयुष्याविषयी असलेला दृष्टीकोन सांगताना मिथुन पुढची कथा विशद करायला लागतो.

"म्हणून अक्षय कडून शेंभर रूपये उशने मांगलो व बारा च्या ट्रेन ने नागभिड ला गेलू....पंधरा रूपयाची टिकीट झाली भाऊ...नागभिडमधी नागपूरची ट्रेन विचारतो तर....पाच वाजता सुटल मनलनं...मग एक पोरगा भेटला...तो मनला चल बस ना जावू....पैदल चालत बस स्टाँप वर आलून....टिकीट विचारतो तर नव्वद रूपये....अनं माझ्याजवळ नव्वदलं पाच कमी...पण देवासारखी पोरगा भेटला भाऊ....दहा रूपये मालं देवून नागपूरलं चल मनलन..।"

एवढं सांगतांना त्याला त्याचा अभिमान वाटत होता.

"नागपूर तं मलं माहित नवतां...मनून दिघोरीलं उतरलू...पक्या चा नंबर चिठ्ठी वर लिहून नेलो होतो.....एका आबाजीलं फोन लावून दे मनलू तं लावून देलन..।"

"हैलो, पक्या, मी मिथून बोलत आहो....मी नागपूरला आलो....तु मलं नेवालं ये..।"

"नागपूरला कोठी उतरलास तं." पलीकडून पाँलिटेक्निक ला शिकत असलेला मिथून चा गावातील वर्गमित्र प्रकाश उत्तरला.

"अरे, मी दिघोरिला उतरलो...मलं काहीच समजून नाही राहिला...माझ्याकडे पैसे पण नाहित..फक्त पाच रूपये आहेत."

"तु कसातरी गणेशपेठ ला ये मी येतो नेवालं"

"किती दुर आहे त....मलं काहिच समजत नाही आहे."

"तु फक्त कोणलही विचारून गणेशपेठ ला बस स्टाँप वर ये."

एवढ्यात फोन चा संपर्क तुटल्यामुळे प्रकाश सोबत मिथुनचं बोलणं होवू शकलं नाही.

"मग कसा गेलास रे गणेशपेठ पर्यंत?" मी विचारलं.

"एक अँटोवाल्यालं विचारलो तं...चाळिस रूपये लागतील मनलन....मंग पैदल विचारत विचारत चालत होतू....रस्त्याच्या बाजूला पानठेल्यात गेलो..।"

"एक एक रूपयाची सिगारेट दे भाऊ."

"एक नाही दहा रूपयाचा पाकीट विकत घ्यावं लागेल." पानठेलावाला उत्तरला.

"खिशात पाचच रूपये आहेत ना गां..देवून दे ना गां."

"कोणलं घोचू समजत आहेस...जा दुसऱ्या दुकानातून घे."

"पानठेल्यावाल्यालं शिव्या देत देत जात होतू तं....एका टँक्सी वाल्यानं थांबून बस मटलनं....मी पण बसून गेलू."

"भाऊ माझ्याकडे पैसे नाहीत गां....पाकिट मारला माझा...बस स्टाँप पर्यंत घेवून जा ना."

"कशाला बसलास...उतर लवकर." टँक्शीवाला बोलला.

"कोणत्या गावातील व्हय बापू." लगेच बाजूला बसलेली सभ्य स्त्री टँक्शीवाल्याचं बोलणं तोडत बोलली.

"गोंदियाचा हो काकू." मिथुन उत्तरला.

तोपर्यंत टँक्शीवाल्यानं टँक्शी थांबवून उतरण्यासाठी इशारा केला.

"हे घे बापू...दहा रूपये." माणुसकी आताही जिवंत असल्याची साक्ष देत त्या सभ्य स्त्रीने दहा रूपये मिथून च्या हातावर टेकवले.

"एक रूपयाची सिगारेट ओढत व टँक्शीवाल्याला शिव्या देत पुढे चालत होतो....चौका चौकात पत्ता विचारत होतो." त्या टँक्सी मधील काकूचा निरोप घेतल्यानंतर मिथून पुढे चालत चालत गणेशपेठ जवळ पोहचला.

बस स्टाँप वर प्रकाश हाप पँट व टि शर्ट घालून वाट बघतच होता....हाप पँट व टि शर्ट कदाचित मिथून ने लवकर ओळखावे यासाठी घातला असावा, असे वाटत होते.

"पक्या दिवसभर उपाशी आहो बे, कातावून भुक लागली आहे. खावलं काहितरी पाहिजे."

"अबे पहिले रूमवर तं चल,जेवन करशिल."

दोघांनी प्रकाश मार्गक्रमण केले, वाटेत मिथून दिवसभर  घडलेला वृतांत कथन करत होता.

पायी चालत रूमवर पोहचल्यानंतर प्रकाश चा रूम पार्टनर सोहेल खान याने बँग हातात घेत मिथुनला बाथरूम दाखवली. वरवरचे प्रसाधन केल्यानंतर मिथुन रूमवरच्या उरलेल्या जेवनावर ताव मारत बसला.

"क्यो घर छोडकर भागके आया, मिथून...?" सोहेल खान बोलू लागला.

"बे, घरी जीव वर आला, पैसे नाही काही नाही, साला एक मोबाईल पण नाही, काही तरी कामधंदा करिन, मजा करीन मनून पळत आलो... गावात राहून काहिच कामधंदा नाही, माय बाप पैसे देवालं पण तयार नाही".

".....म्हणजे घरी माहित नाही आहे, बे." मध्येच प्रकाश बोलू लागला.

"घरी सांगलो असतो ,त कोठी जावू देलनं असतन माझ्या मायेना."

"यहाँ कोई कामधंदा नही मिलता, तेरी उम्र भी पुरी हुई नही है, कंपनी में काम करने के लिए अठरहं साल भी पुरे नही हुये, तुझे कौन काम देगा. हम तुझे गाव जाने के लिए टिकट निकालकर देते है, तु गाव वापस जा।"

"नाही बे खान, आता मी गावी जात नाही, कोणत्या नाकाने जावू बे."

"बरं, आज थांबून जा उद्या गावी जाशील."

"काहितरी कामधंदा पाहून दया ना भाऊ, कोणताही काम चालते."

"इतना आसान नही यहा काम करना, तु चुपचाप गाव वापस जा."

"जेवन करून घे उद्याचं उद्या पाहू....घरी फोन लावू का रे."

"अरे, भाऊ पाया पडतो, पण घरी नको सांगा, सगळे माझ्यासाठी मेले आहेत." असे बोलून जन्म देणाऱ्या आई वडिलांना जिवंतपणीच मारणारा मिथूनचे जेवन आटोपले होते.

तिघेही जण (प्रकाश, मिथून व खान) गप्पा गोष्टी मध्ये रमले....कुणाच्याही चेहऱ्यावर वर्तमान सुधारून भविष्य उज्वल करण्याची चिंता नव्हती, ज्या मातेने जन्म दिला त्या मातेचे ऋण फेडण्याचा व ज्या मातीत जन्मले त्या मातीसाठी थोडाही वेळ तिंघाजवळ नव्हता.

.....तिघांच्याही गप्पा गोष्टीत रात्र कशी झाली हे तिंघांनाही कळली नाही. मिळून जेवन केल्यानंतर थोड्याच वेळात सगळेजन झोपी कसे गेले हे कुणालाच कळल नाही. पण मिथुनचा डोळा लागत नव्हता. ज्या रागाने व बेफिकीरीने तो घरातून निघून गेला....ते कधी घरी न परतण्याचा संकल्प घेवून....त्याच्या जवळपास त्याला पोहचता येत नव्हते....डोळ्यासमोर अंधार दाटत होता....जे स्वप्न मनाशी ठरवून आला ते प्रकाश व खान यांच्यासोबत झालेल्या संवादातून उघड्या डोळ्यांनी उध्वस्त होत होते....रात्र वैऱ्यांची वाटत होती...म्हणून रात्र काढण्यासाठी फेसबूक चा वापर करावा लागला....प्रकाश व खानचा मोबाईल फेसबुक साठी आळीपाळीने वापरत होता....कारण मोबाईल ची बँटरीसुध्दा मिथूनचे अविचारी स्वप्न बघून कंटाळत होती.
    केव्हा तरी पहाटे रात्र उलटून गेल्यानंतर सकाळी तिघेही बसले...प्रकाश व खान आपल्या भविष्याचा विचार सोडून मिथुनच्या भविष्याचा विचार करत होते. शेवटी असे ठरले की मिथुनला तिकिट काढून गावाकडे पाठवावे...पण मिथुन अगोदरच हेकेखोर स्वभावाचा असल्याने त्याच्या गळी हे विचार उतरविण्यासाठी दोंघांनाही बारा घाटचे पाणी प्यावे लागले. दोनशे रूपये हातात देवून दोघेही मिथूनला बस स्थानकावर सोडण्यासाठी आले..अखेर दोघांनी त्याच्या बेफिकीर वृत्तीवर हसत निरोप दिला.

...पण मिथुनच्या मनात वेगळेच चक्र सुरु होते..काहिही करून घरी परतायचे.....प्रकाश व खानला मनात शिव्या देत...प्रवाश सुरू झाला....अर्जुनीची टिकीट असूनसुद्धा तो लांखादूरलाच उतरला...पायी चालत जात गावातील एक मित्र अनिल जो बियर बार मध्ये नोकर होता त्याच्याकडे गेला.

"कुठं आला होतास, मिथून?" मिथूनला अकस्मात बघून अनिल ने प्रश्न केला.

"अरे भाऊ नागपरवरून येत आहो, कामधंदा मिळल म्हणून गेलो होतो, पक्या व खानच्या रूमवरून येत आहो, कोणिच मित्र काम नाही पडत रे भाऊ, आता तु तरी काही कामधंदा पाहून दे" आपली सगळी घडलेली आपबिती तो अनिल जवळ ओकून मोकळा झाला.

"कामधंदा पाहणे फेसबुक इचकण्यासारखी सोपी गोष्ट आहे का बे, तु तं सर्कीट आहेस, तु काहीच करू शकत नाही, चुपचाप घरी जा." त्याला मदत करण्यास असमर्थता दर्शवत अनिलचं बोलणं पुर्ण होण्याअगोदर मिथू बोलू लागला.

"फक्त अजच्या दिवस तुझ्या रूमवर राहू दे, मंग उद्या माझं मी पाहून घेईन."

"नाही बे मिथुन अगोदरच माझा रूम पार्टनर आहे, मालक पण बोंबलते, गाव जवळच आहे, घरी जा"

"कोणीच काम पडत नाही बे, सगळे मतलबी आहा..." असे रागाने बोलत तो निघून आला, सुर्य दिवसभर भटकंती करून विसावा घेण्यास निघत होता, तसे त्याच्या पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले.....बस स्टाँप वर ट्रँव्हल्स वाट पाहत...दहा रूपयाचे भजे फस्त करून खर्रा घेते न घेते तोच ट्रँव्हल्स आली...तिच्यात चढून तो स्वगावी न उतरता खर्रा चघळत व खिडकीतून पिचकारी सोडत अर्जुनीला पोहचला....तो पर्यंत जवळचे पैसे संपून गेले होते.

रात्री साडेसहा ला येणारी व गोदिंया ला जाणाऱ्या ट्रेन ने तो तिकीट न काढता, गोंदिया ला जाण्यासाठी बसला...हि आशा ठेवून की गोंदिया ला कुठतरी काही कामधंदा मिळेलं.

तोपर्यंत त्याच्या घरी त्याच्या घरी येण्याची बातमी पोहचली होती...पण सगळ्या बसेस जावून सुध्दा घरी तो घरी न परतल्यामुळे घरच्या लोंकाचा जीव भांड्यात पडला होता.

रात्री मिथून नऊ वाजता गोंदियाला पोहचला, तो पर्यंत पाण्याची रिमझिम सुरू झाली होती....प्रत्येक खानावळ, लाँज मध्ये कामधंदा देण्याची विनवणी करत होता. पण त्याच्य जवळ असलेल्या आधारकार्ड वर वयाची अठरा वर्षे पुर्ण न झाल्याने सगळेजन काम देण्यासाठी असमर्थता दर्शवत होते.

काम शोधता शोधता हा पाण्याने ओलाचिंब झाला होता...बाहेर येणाऱ्या हवेने अंगाला थंडी लागायला लागली होती. निराश व मरगळलेल्या चेहऱ्याने पुन्हा स्टेशनवर परत आला. बाहेरचे जग जसा तो विचार करत होता, तसे नाही हे त्याला कळून चुकले होते...तेवढ्यात त्याला आठवले की  मोहन नावाचा एक वर्गमित्र गोंदियामध्ये मावशीकडे राहत होता, पण त्याच्याशी संपर्क कसा साधायचा हा प्रश्न पडला? मग त्याच्या डोक्यात प्रकाश पडला की फेसबुक वर त्याचा नंबर मिळू शकते...कारण हा स्वतःच फेसबुक किंग होता.

रेल्वे स्टेशनवर एका चाळीसीतल्या माणसाकडे अँन्ड्राईड मोबाईल बघून त्या चाळीसीतल्या माणसाकडे मोबाईल ची मागणी करू लागला.

"काकाजी, थोड्यावेळासाठी मोबाईल देता का जी, माझा मोबाईल हरवला, मित्रांला फोन करावचा आहे, फेसबुक वरून नंबर घेतो."

"मला ते फेसबुक वगैरे काही समजत नाही, नंबर दे लावून देतो."

"नंबर माहित नसे जी, फेसबुक वर असल, तं घेतो, सगळे मोबाईल मध्येच गेल, तुमच्या मोबाईल मध्ये नेट असेल ना?" रडक्या चेहऱ्याने मिथून बोलत होता.

रंडकुंडीला आलेला त्याचा चेहरा बघून त्या माणसाने त्याच्याजवळ मोबाईल दिला.

याने नेट सुरू करून एक मिनिटात फेसबुक चे लाईट व्हर्जन इन्सटाँल करून लाँग इन केला, व फेसबुक वर मोहनचा नंबर शोधत होता, पण त्याने आपला नंबर अदृश्य केला होता....आता मिथुनची पंचाईत झाली होती, नशिबाला दोष देते न देते तोच त्याला एक मित्र ....रोषण, फेसबुक वर आँनलाईन दिसत होता..त्याच्याशी याने चँट करणं सुरू केलं.

"रोषण, मी गोंदियात आहो रे, मोहन चा नंबर दे बरा."

"जेवन केलास का नाही, गोंदियालं केव्हा गेलास."

"ते जावू दे, पयला नंबर दे."

रोषणने मोहन चा नंबर दिल्यावर त्याने मोहनला फोन लावला.

"हैलो, मोहन्या मी मिथुन बोलत आहो, गोंदियात रेल्वे स्टेशनवर आहो, भाऊ, मलं रात्रभर झोपावलं दे, दोन दिवस झाला उपाशी आहो."

"माझी मावशी तेड्या दिमाकाची आहे, मी घरी कोणालं आणलो  तं चिडचिड करते, तेथिच राय, सकाळी सात च्या गाडी ना गावी जाशील."

"कोणीच मित्र कामी नाही पडत बे, सगळे आपल्या मतलबाचे आहा."

"समजून तं घे, मीच येथी कसा राहतो, ते मलाचं माहित आहे."

रागाने मिथुनने फोन काटल्यानंतर त्या माणसाला फोन आभार मानत फोन परत केला.

आता याला पावसाने ओला झाल्यामुळे थंडी लागायला सुरवात झाली, भुकेने पोटात कावळे ओरडायला लागले, याला समजून आलं होतं की आई वडिलांच्या कमाईवर पोट भरणे जेवढे सोपे आहे, तेवढे स्वतःच्या कमाईवर जगणे. त्याने आता घरी खाली मानेने परत जाण्याचे ठरवले होते.

रिकाम्या खिश्याने  पोट भरून रात्र काढण्यासाठी तो टापटीप व चांगल्या कपड्यात भिक मागू लागला. चांगल्या कपड्यातील धट्टा कट्टा भिक मागणारा भिकारी बघून कुणी एक रूपयाही भिक देत नव्हता. याला कळून चुकले होते की, या दुनियेच्या रंगमंचावर भिकाऱ्याचे पात्र करणे कीती कठिण आहे. रात्रभर घड्याळाकडे बघत रात्र उलटण्याची वाट बघत होता...पण त्याला एक मिनिटही तासासारखा भासत होता.

एकदाची सकाळ झाली , एका माणसाला अर्जुनीला जाणारी ट्रेन विचारता विचारता त्याच्याशी बोलू लागला.

"कुठं चालल्या काकाजी?"

"वडसाला...आणि तु..?"

"अर्जुनीला"

"टिकीट काढून झाली का....?"

"...नाही... माझ्याकडे पैसे नाहीत... रात्रभार उपाशी आहो...."  त्या माणसासोबत बोलत असतांना आपली कर्मकहाणी सांगत होता.

"बरं...हे घे...एक वडसा व एक अर्जुनीची टिकीट काढून आण."  एवढे बोलून त्याने शंभर ची नोट त्याच्याकडे दिली व त्याच्यासोबत तो टिकीटघराकडे चालू लागला

टिकीट काढून झाल्यानंतर ....

"चल, समोरच्या डब्यात बसू, गर्दी राहत नाही."

केविलवाणा चेहरा करून मिथून त्याच्यासोबत समोरच्या डब्यात दोघेही बसले.थोडं इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्यानंतर त्या इसमाने याच्या पाठीला, चेहऱ्याला, हाताला....आक्षेपार्ह पध्दतीने हात लावणं सुरू केलं....मिथुनने त्याच्या मनातील भाव ओळखून आपली बँग धरून उठला....डब्बा बदलविण्यासाठी.....गर्दिच्या ठिकाणी बसण्यासाठी.... जेणेकरुन त्या इसमापासून सुटका होईल.

गर्दिच्या ठिकाणी बसल्यानंतर .....थोड्याच वेळात ट्रेन सुटली....हा मनातल्या मनात बोलू लागला.

"याच्यानंतर कधीही घरातून पळून जाणार नाही....जे माय बापानं देलं ते खाईन....फाटले कपडे घालीन....पण घर सोडून जाणार नाही. जेथी भिक मागणाही कठीण आहे तेथी जगू शकत नाही...फेसबूकवर हजारो मित्र असतील पण तेही काही कामाचं नाही...कोणीही मदत करत नाहीत.... शेवटी शिव्या देवोत की बोंबलोत पण माय बापचं कामी पडतेत." असे विचार करत असतांना त्याचे स्टेशन आले. तो उतरला व घरी निघून गेला ते कधीच घरून पळून न जाण्याचा संकल्प घेवूच.

( प्रस्तूत लघूकथा सत्यघटनेवर आधारित असून पात्रांची नावे बदलली आहेत.)
............समाप्त....

2 comments:

  1. अतिशय मार्मिक आणि भावनेला स्पर्श करणारी कथा...👌👌👌

    ReplyDelete