Thursday 26 March 2020

विज्ञानाला अध्यात्माची जोड हवी

पुर्वीपासून अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना केली जाते. कोण श्रेष्ठ यावर तुलना केली जाते व वाद होतात. प्रत्येकाचे समर्थक आपल्या भुमिकेवर, मतावर ठाम असतात. पण दोन्ही बाबीचे समर्थक किंवा अनुयायी एक मुळ मुद्दा लक्षात घेत नाही की, अध्यात्म आणि विज्ञान यांची तुलना करणे हेच चुकीचे आहे. कारण तुलना करण्यासाठी सर्वसाधारण नियम आहे की, ज्या दोन बाबीची तुलना केली जाते निदान त्यामध्ये काहितरी साम्य असावे लागते. तरच त्यामध्ये तुलना करता येते. उदाहरण घ्यायचे झाले तर लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांची तुलना होवू शकत नाही किंवा आशा भोसले व सुनिल गावसकर यांची तुलना होवू शकत नाही. कारण त्यांचे कार्यक्षेत्र वेगवेगळे आहे. पण लता मंगेशकर व आशा भोसले किंवा सचिन तेंडुलकर व सुनील गावस्कर यांची तुलना करता येते कारण त्यांच्या कार्यक्षेत्र समान आहेत. अध्यात्म व विज्ञान यांचे कार्यक्षेत्र सुध्दा भिन्न आहे. तसेच अध्यात्म व विज्ञान या मुळातच दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळेच त्याची तुलना होवू शकत नाही. एकाचा निकष दुसऱ्या बाबीसाठी उपयोगाचा नाही. विज्ञानाच्या नियमांचा निकष लावून अध्यात्म तपासता येत नाही आणि अध्यात्माच्या पातळीवर विज्ञान खरे उतरू शकत नाही. पण असेच होत आहे कारण मनुष्य आयुष्यभर या दोघांमध्ये गल्लत करतो, एकाच्या मार्गावर गेले की दुसरे सोडले पाहिजे असे त्याला वाटते व येथेच चुकते. दोन्ही गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी सारख्याच महत्वाच्या आहेत.

अध्यात्म म्हणजे स्वतःकडे पाहणे, अर्थातच स्वत:कडे पाहण्यात आत्मपरीक्षण येते. त्यातुनच आपल्या जीवनाचा खोलवर दडलेला अर्थ काय? याचा विचार सुरू होतो आणि पुर्णत्वाची आस निर्माण होते. आपल्या दैनंदिन आयुष्यापेक्षा त्यातल्या अनेक ऐहिक गोष्टिपेक्षा मोठे काहितरी परिपुर्ण असलेले, खोलवर अर्थ प्राप्त करून देणारे आयुष्यात काहितरी आहे याची जाणीव होते. आपल्या अवतीभोवती जगात कहीतरी अर्थ दडला आहे त्याचा बोध घेऊन, त्यात आपले म्हणजे मानवाचे स्थान काय? कार्य काय? हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते. हि प्रक्रिया म्हणजे अध्यात्म होय. मानवाकडून अजून एक गल्लत होते ती म्हणजे अध्यात्म आणि धर्म एकसमान आहेत. वस्तुतः अध्यात्म व धर्म या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. अध्यात्म आणि धर्म यांची गल्लत होण्याचे कारण म्हणजे अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कुती चा भाग आहे. त्याचबरोबर धार्मिक माणुस आध्यात्मिक असतो. धर्म मानसाला जगण्याचा मार्ग दाखवतो, पण खुप वेळा धार्मिकता हि रूढी, परंपरा, परमेश्वर स्तुती, पुजा अर्चा, प्रार्थना, कर्मकांड यातून व्यक्त होते. याउलट आध्यात्मिकतेला रूढी, परंपरा, परमेश्वर स्तुती, पुजा अर्चा प्रार्थना, कर्मकांड यांचे बंधन नसते. पण माणसांपेक्षा श्रेष्ठ असा कुणीतरी आहे हे आध्यात्मिक माणुस मानतो किंवा मानत नाही. आस्तिक व नास्तिक दोन्ही आध्यात्मिक असू शकतात. सर्वसाधारणपणे हा देह मन किंवा मेंदू चालवत असतो, त्यामुळे मनात किंवा मेंदूत जे येईल ते आपण करित असतो. ते बरोबर की चुक हे त्याचा परिणाम ठरवत असते. तेव्हा प्रत्येक गोष्टीचा परिणाम चांगला येण्यासाठी त्या मनालाच किंवा मेंदूलाच चालवायला शिकविणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म होय. परिस्थितीनुसार जगायला शिकविणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. एखादे संकट आले की, परिस्थिती ला दोष देत बसले की मन निराश होते. याउलट आपल्या जीवनात काही शुध्द हेतू आहे असे मानणारा कमी निराश होतो. अध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा, समाधान, शांती, क्षमाशिलता आणि प्रेम निर्माण होते. नृत्य, संगिंत, चित्रकला, अभिनय, शिल्पकला, साहित्यकृती या कलाकृतीतून अध्यात्मिकता व्यक्त  होते.

विज्ञान हा भौतिक गोष्टींसी निगडीत असतो. निसर्गातील निसर्गाने बनविलेल्या बाबी साचेबध्द नियमात बसविण्याला विज्ञान म्हटले जाते. त्याचबरोबरीने निसर्गातील निसर्गाने बनविलेल्या बाबी  समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी विशिष्ट नियमाच्या आधारे बदलविणे विज्ञानामुळे शक्य झाले आहे. मानवाच्या दृष्टीने विचार केला तर विज्ञानामुळे मानवी जीवन सुखकर झाले. विश्र्वातील अनेक गुढ उकलणे सुध्दा विज्ञानामुळे शक्य झाले. 

विज्ञानाच्या मदतीला अध्यात्माची जोड असली की विज्ञानामुळे सगळ्या मानवजातीचे कल्याण होण्यास हातभार मिळतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास विज्ञानाला अध्यात्माची जोड असती तर आज विजनिर्मितीसाठी उपयोग होत असलेल्या अणूशास्त्राचा उपयोग हिरोशिमा व नागासाकीत विध्वंस करण्यात झाला नसता.

No comments:

Post a Comment