Saturday 28 March 2020

मी निसर्ग बोलतोय

हे स्वत:ला सर्व शक्तीमान समजणाऱ्या मानवा...भलेही तु पक्ष्याप्रमाने आकाशात विहार केलास. खोल समुद्रात समुद्रातील जलचरही पोहचू शकला नाही एवढ्या खोलवर तु पोहचला. अख्ये ब्रम्हान्ड पालथे घालण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाच्या सहाय्याने विज्ञानाच्या प्रगतीमुळे निसर्गावर काही तुरळक वेळा मात केलास. पण आज एका सुक्ष्मदेही विषाणूच्या प्रकोपामुळे तु हतबल झाला आहेस. कितीतरी पशूपक्षी आज माझ्या सानिध्यात मोकळेपणाने स्वच्छंद विहार करत आहेत. पण तु मात्र एका भित्र्या भागूबाई प्रमाणे बिळात लपला आहेस. स्वत:च्या बुध्दीचा अतिरेकी वार करून तु माझ्या मुळावर उठला होतास. पण आज दिवस माझा आहे कारण मी तुला आज तुझा पराभव होतांना उघड्या डोळ्यांनी बघत आहे. हे युध्द तु कधीतरी आपल्या कुशाग्र बुध्दिने जिंकशील. पण तुझी झालेली अपरिमित हानी तु कधीच भरून काढणार नाही. तुझ्या कुशाग्र बुध्दी चातुर्याच्या बळावर मी कितीतरी वेळा मात खावून तु दिलेल्या जखमा आजही ओल्याच आहेत. तु केलेल्या प्रत्येक घावाच्या मोबदल्यात मी तुला आपल्या डोळ्यातील अश्रू डोळ्यात साठवून भरपूर काही दिलं. डोळ्यात झालेली अश्रूंची गर्दी लपवून प्रत्येक वेळी मी तुला सतर्क केलं की, माझ्या डोळ्यातील अश्रूंच्या दाटीने ने जेव्हा माझे डोळे फुटतील. तेव्हा त्या अश्रूंच्या महापूरात बुडल्यानंतर तु कधीच बाहेर निघू शकणार नाही. पण तु माझे कधीच ऐकण्याच मनस्थितीत नव्हतास. कारण तुझ्या बुध्दीचा घमंड तुला ऐकू देत नव्हता. तु केलेल्या जखमांच्या बदल्यात मी तुझ्यावर सुड उगवतो, असे पण समजू नको. तो तुमच्या मानवाच्या स्वभावगुण असेल माझा नाही. आतापर्यंत जेवढ्या जखमा दिल्या त्या पचविण्याची ताकद माझ्याकडे अजुनही शिल्लक आहे. फक्त त्या जखमांवर मिठ चोळण्याचे काम न करता माझ्या नियमाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न केला तरी पुरेसे आहे. नाहीतर तुझ्या विनाश तु आपल्या डोळ्यासमोर बघण्यासाठी सज्ज रहा.

No comments:

Post a Comment