Saturday 16 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घर

बाबासाहेबांचे सुरवातीचे दिवस अत्यंत कठीण परीस्थितीत गेले. बॅरिस्टर झाल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली. आणि अल्पावधीतच त्यांची एक हुशार वकील म्हणून ख्याती चोहीकडे पसरली. आणि 1930 सालानंतर त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत गेली. तेव्हा बाबासाहेबांचं कार्यालय परळच्या दामोदर ह़ॉल जवळ होतं. आता घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता वाढला होता. पोयबावाडीतील घर अपूरं पडू लागलं होतं. पुस्तकांची आबाळं होत होती. म्हणून त्यांनी आता स्वतःसाठी नवीन घर बांधण्याचा निश्चय केला.बाबासाहेबांनी स्वतःची इमारत उभी करताना त्यात ग्रंथालय कसे असावे, याचा अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला होता. परदेशात पाहिलेल्या उत्तमोत्तम ग्रंथालयांची वैशिष्ट्ये आपल्याकडेही असावीत, असा प्रयत्न त्यांनी केला. त्या रचनेत तीन-तीन खोल्यांचे दोन ब्लॉक्स राजगृहाच्या तळमजल्यावर बांधून घेतले होते. त्या दोन ब्लॉक्समध्ये त्यांनी आपल्या कुटुंबीयांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर डॉ.बाबासाहेबांनी स्वत:च्या राहण्याच्या सोयीबरोबरच आपल्या प्रिय ग्रंथालयाची आणि कार्यालयाचीही सोय केली होती. त्यांनी स्वत: आराखडा तयार करून त्याप्रमाणे सोयी करून घेतल्या होत्या.१९३० मध्ये त्यांनी दादरच्या हिंदू कॉलनीत ९९ व १२९ क्रमांकाचे प्रत्येकी ५५ चौरस यार्ड क्षेत्रफळाचे दोन प्लॉट खरेदी केले. पाचव्या गल्लीतील १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर आपल्या कुटुंबीयांबरोबरराहण्यासाठी इमारत बांधण्याचे ठरवलं तर तिसर्यागल्लीतील ९९ क्रमांकाच्या प्लॉटवर भाड्याने देण्यासाठीची इमारत बांधण्याचे नक्की केले. बांधकामासाठी त्यांनी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून कर्ज मिळवले आणि तात्काळ बांधकाम सुरू केले. बांधकामावर देखरेख करण्याचे कामास श्री. आईसकर यांना नेमले होते. १९३१ सालच्या जानेवारी महिन्यात १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर राहण्याच्या वास्तूचे बांधकाम सुरू केले. ते बांधकाम १९३३ मध्ये पूर्ण होऊन "राजगृह' ही राहण्याची वास्तू तयार झाली.प्लॉट क्रमांक ९९ वर दुसर्या इमारतीचे बांधकाम १९३२ मध्ये सुरू झाले. ते बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यांनी त्या इमारतीचे नाव "चार मिनार' असे ठेवले. "राजगृह' हे नाव हिंदू संस्कृती आणि बौद्ध संस्कृतीशी संबंधित होते, तर "चार मिनार'हे नाव मुस्लिम संस्कृतीशी संबंधित होते. इमारतीचे प्रत्यक्ष बांधकाम १९३१ च्या जानेवारी महिन्यात सुरु होऊन ते सन १९३३ मध्ये पूर्ण झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या कुटुंबीयांसह "राजगृह' या आपल्या सुंदर व प्रशस्त वास्तूत राहण्यास आले होते. पुढे ग्रंथांच्या खरेदीच्या आणि इतर गोष्टींच्या कर्जाची फेड करण्यासाठी ९ मे १९४१ रोजी त्यांनी "चार मिनार' ही इमारत विकली. मात्र "राजगृह' ही वास्तू त्यांनी कायम आपल्या मालकीची ठेवली.

2 comments:

  1. दोन घरांची माहिती वगैरे नवीनच आहे.. हे माहिती नव्हते..thanks

    ReplyDelete
  2. सुंदर माहिती

    ReplyDelete