Wednesday 20 April 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पुतळे

पुतळ्यांचं स्वतःचं एक राजकारण असतं. आज जर शिवरायांचे पुतळे नसते, सम्राट अशोकाने शिलालेख कोरून ठेवले नसते तर कदाचित इतिहासाची पाळंमूळं नष्ट करण्यात  कोणतीच कसर ठेवली नसती. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांच्या बाबतीतही नेमकं तेच.या संदर्भातील एक किस्सा ... केनेथ रिगनाल्ड ग्रिफिथ, वेल्श प्रांतातला हरहुन्नरी निर्माता, दिग्दर्शक. त्यानं आपल्या आयुष्यातील बराचसा काळ बीबीसी सारख्या मातब्बर संस्थेला अनेक गाजलेल्या फिल्म्स, डॉक्युमेंटरी बनवून देण्यात मार्गी लावला. पंडीत जवाहरलाल नेहरूंवर बनवलेली त्यांची डॉक्युमेंटरी फिल्म प्रचंड गाजली होती. त्याच धर्तीवर त्यांना इंदिरा गांधींच्या सरकारकडून नेहरूंवर गांधीसारखी फिल्म बनवण्याचं आमंत्रण मिळालं. केनेथ ग्रिफिथ यांनी सारी तयारी करून भारत गाठलं. आणि फिल्म बनवण्याआधी भारत फिरण्याची इच्छा व्यक्त केली. ग्रिफिथ यांनी अख्खा भारत पालथा घातला. नेहरूंच्या कार्याच्या खाणाखुणा शोधण्यासाठी त्यांनी शहरं, गावं पायाखालून घातली. पण त्यांच्या नजरेला वेगळेच चित्र आलं. गावागावात बाबासाहेबांचे पुतळे दिमाखातउभे दिसले. बाबासाहेबांचा अनुयायी वर्ग, त्यांनी केलेलं काम पाहूनकेनेथ इतका प्रभावित झाला की त्यानं स्वतः नेहरूंऐवजी बाबासाहेबांवरच सिनेमा बनवायचा चंग बांधला. तशी इच्छा त्यानं इंदिरा सरकारकडेही बोलून दाखवली. केनेथ पुन्हा इंग्लंडला रवाना झाला. भारतातील भटकंती दरम्यान जमवलेला सर्व डेटा युटीलाईज करून भली मोठी स्क्रिप्ट बनवली. स्टोरी बोर्ड तयार केला. शक्य तितकं कास्टिंग ऑन पेपर तयार ठेवलं. आणि बाबासाहेबांवर सिनेमा बनवण्यासाठी आपण तयार असल्याचे भारत सरकारला कळवलं. पण काय माहीत माशी कुठं शिंकली.. केनेथ ला पुन्हा भारतात येण्यासाठी भारत सरकारकडून व्हीजा मिळालाच नाही. थोडक्यात त्याचा व्हिजा नाकारण्यात आला. त्यानं नंतर बरेच प्रयत्न केले. पण ते सारे व्यर्थठरले. इंटरनेटवर याबाबतीत बरेचसे संदर्भ उपलब्ध आहेत. असो..Sakya Nitin ने यात दिलेली माहीती अजून ताप आणणारी.. ती अशी .."केनेथ ग्रिफिथ यांना चित्रपट बनावन्यास नकार मिळाल्यानंतर त्यांनी 700 भागांची मालिका बनविन्यासाठी काही प्रयत्न केले पण 4-5 वर्षे प्रयत्न केल्यानंतर त्याला देखील नकार मिळाला. दुर्दर्शनचे गोस्वामी नावाचे कोणी अधिकारी त्या फाइलवर कुंडली मारून बसले होते. नंतर जब्बार पटेलांचा सिनेमा आला. बरा होता तो. काही नसल्यापेक्षा असलेलं बरंच म्हणायचं. पण 1936 ते 1951 चा कालखंड अगदी दाखवायचा म्हणून दाखवून टाकला. अनेक चुका होत्या त्या अक्षम्य होत्या. असो..तर बाबासाहेबांच्यापुतळ्यात नेमकं असं काय होतं की केनेथ ग्रिफिथ भारावून गेला असावा.. गाव लागलं की गावाच्या प्रवेशद्वारावरचभविष्याकडे अंगुलिनिर्देश करणारे बाबासाहेब आपल्या नजरेस पडतात. निळा कोट अन् लाल ओठ अशा लहेज्यातील बाबासाहेब आपल्या प्रत्येक पुतळ्यात हातात संविधान, डोळ्यांत प्रचंड आत्मविश्वास, उज्ज्वल भविष्याचा आशावाद, शिका, संघर्ष करा अन् संघटित व्हा चा नारा देताना दिसतात. आज देशभरात गाव तिथं आंबेडकर ही नवी म्हणच रुजलीये.बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वात एक प्रकारची भव्यता आहे. त्यांच्या पुतळ्याच्या स्ट्रक्चरला विशिष्ट आकार आहे. ज्यात पाहणाऱ्याच्या डोळ्यांना एक आदरयुक्त भीतीचा भास होतो. एक जरब बसते. तर कोणत्याही संकटातून उभी राहण्याची उमेद ती आकृती मनात निर्माण करत असते. त्यांच्या पुतळ्याच्या रचनेत असणारं पुस्तक, मगते संविधान असो किंवा अॅनाहिलेशन ऑफ कास्ट हे कायम आपणा सर्वांना लढण्याची, शिकण्याची, संघर्षाची अन् कधीही हार न मानण्याची जिद्द देत असते.आपण त्या पुतळ्यांतून प्रेरणा घ्यायला हवी. तरच बाबासाहेबांना पुतळ्यांत बंदिस्त होण्यापासून आपण वाचवू शकू.. त्यावर होणाऱ्या राजकारणाला आळा घालण्यात यशस्वी होऊ शकू..तुम्हाला जे वाटतंय ते बिंदास व्यक्त व्हा. आपण नवा दृष्टिकोन आत्मसात केला पाहीजे. प्रतिकांकडून प्रेरणा घ्यायची की त्यांना व्यक्तिपुजेत बंदिस्त करायचं हा कळीचा मुद्दा झालाय.

5 comments: