Thursday 14 April 2022

डॉ बाबासाहेब आंबेडकर- फॅशन स्टेटमेंट

बाबासाहेबांच्याव्यक्तिमत्त्वाच्या अनेक महत्त्वपूर्ण पैलूंपैकी त्यांचं फॅशन स्टेटमेंट हे एक महत्त्वाचं अंग आहे. ते अशासाठी की त्या काळात अप टू डेट राहणारी केवळ तीनच माणसं भारतीय समाजकारणात अग्रेसर होती. पं. जवाहरलाल नेहरू, बॅ. मोहम्मद अली जिन्ना आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर.या तिघांपैकी बाबासाहेब सोडले तर बाकी दोघे हे सधन कुटूंबातील. बालपण आणि तारुण्य सर्व सुख सोयी आणि संसाधनांनी भरलेल्या वातावरणात गेलं. याउलट बाबासाहेबांच्याघरी कमालीचं दारिद्र्य होतं. जातीव्यवस्थेचे,अस्पृश्यतेचे चटके अलग. तरी वकिली व्यवसायातून कमावलेल्या संपत्तीतून त्यांनी स्वतःचं एक फॅशन स्टेटमेंट तयार केलं होतं. तसे ते स्वभावाने पूर्णतः युरोपीयनच होते. पोटाला खायला मिळालं नाही तरी चालेल पण अंगावर चांगलं कापड हवं हा त्यांचा आग्रह असे. बाबासाहेबांना सिडनहम कॉलेजमध्ये असताना पहिला पगार मिळाला. त्यांनी रमाईला सांगितलं की घरातल्या सर्वांना कपड्यांची मनसोक्त खरेदी करून घे. रमाई सुद्धा जिंदादील माणसाचीच सोबती. बैलगाडी भरून कपड्यांची खरेदी केली. हा भाग वेगळा की त्या वेळी बाबासाहेबांना नऊशे रुपये पगार झाला होता. तर बाबासाहेबांकडे उंची सुट होते. प्रत्येक मोसमात घालता येतील अशा पद्धतीने त्यांनी कापडांची निवड सुट साठी केलेली होती. प्रत्येक सुटची शिलाई वेगळ्या ढंगाने केलेली होती. प्रत्येक सुट हा थ्री पीस असे. सुटच्या आत पेनांसाठी वेगळा खिसा, अचानकपणे टिपणे काढल्यानंतर कागद सुरक्षित रहावा म्हणून असलेला वेगळा खिसा अशी ठेवण असायची. त्यातल्या त्यात त्यांच्या जोधपुरी सुटची मिजास ही भारीच असायची. पंजाबात असताना त्यांनी परिधान केलेला काळा जोधपुरी सुट हा मला त्यांनी आजवर परिधान केलेला सर्वात बेस्ट सुट वाटतो. अन् दुसरा सुट हा तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्यासोबत असताना घातलेला पांढऱ्या रंगाचा जोधपुरी सुट. त्यांची पँट मस्त ढगाळ, लांबीला भरपूर अन् पोटापर्यंत ओढलेली असायची. त्यांचे वापरायचे बेल्ट हे साधे असले तर उच्च दर्जाचे होते. त्यांना हॅट आवडत. त्याचं एक वेगळं कलेक्शन होतं त्यांच्याकडे. बाबासाहेबांच्याचष्म्याची फ्रेम मला सर्वात जास्त स्टाईलिश आणि सेक्सी फ्रेम वाटते. इथं सेक्सी या शब्दावर आकांडतांडाव करण्यापेक्षा डोळ्यांवर घातलेला गॉगल किंवा इतर चष्मा हा तुमच्या व्यक्तीमत्त्वाला अधिक मादक बनवत असतो हे लक्षात घ्या. तर त्यांच्या चष्म्याच्या फ्रेम ह्या त्यांनी अनेकदा युरोपात असताना बनवून घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं कपाळभव्य होतं. डोळे मोठे होते. कान सुद्धा मोठे होते. त्यांचे हात आणि हातांची बोटं सुद्धा साधारण लांबीपेक्षा मोठी होती. ही सारी गुणवैशिष्ट्ये बुद्धाच्या शरिरातही होती. खरे तर ही लक्षणे एका महान प्रकांड पांडित्याची असतात. त्यामुळे गोलाकार... थोडक्यात अंडाकृती फ्रेमचा चष्मा त्यांना परफेक्ट शोभायचा. बाबासाहेब शर्टवर तसे फारच कमी असायचे. फावल्या वेळेत ते लेहंगा किंवा लुंगी नेसत. त्यांचा फक्त शर्टवरचा एकमात्र फोटो आहे तो मिलिंद कॉलेज, औरंगाबदमधला.आता थोडंसं पुढे येऊयात... बाबासाहेबांच्याखिशाला एकाच वेळेस सहा पेन असत. त्यातील कित्येक पेन महागडे असायचे. तब्बल दोनशे रुपयांचे पेन असायचे ते. त्यांना इन्क पेन आवडायचे. त्यांची पेन पकडण्याची पद्धत सुद्धा अफाट होती. कित्येक पेनवरची कव्हर कलर अजूनही शाबूत आहेत. इतक्या लेवीश पेनचं कलेक्शन अजूनतरी कोणा इतरांकडे असेल असे वाटत नाही.बाबासाहेब युरोपीयन स्टाईलवालं चैनीचं घड्याळ वापरायचे. तसंच त्यांच्या हातातील घड्यांळ्यांचं कलेक्शन सुद्धा फार सुंदर होतं.बाबासाहेब सुट परिधान करताना आतला शर्ट हा कोटांच्या पुढे कसा असेल आणि शर्टाला असलेली बटणं आणि पुढचं घड्याळ शिस्तीत कसं असेल याकडे खुप बारकाईने लक्ष ठेवायचे. तीच गत त्यांच्या बुटांच्या बाबतीत. त्यांनी वापरलेले बुट हे त्या काळातले सर्वोत्तम बुटांपैकी एक होते. आज अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेल्या बुटांचे जोडे आपल्याला पहायला मिळतात. मी मघाशीच म्हटलं की त्यांना हॅटचा शौक होता. त्यांनी विविध प्रकारच्या हॅट वापरल्या, काही वेळा कॅप वापरल्या. राऊंड कॅप सुद्धा घातली. तसेच काळ्या चष्म्यांच्या बाबतीतही तीच गत होती. त्यांच्याकडे निरनिराळ्या रंगाच्या टाय होत्या. कोणत्या रंगाच्या सुटसोबत कोणत्या टाय असाव्यात याबाबतचात्यांचा चॉईससुद्धा भन्नाट होता. डायबिटीसचा त्रास झाल्यानंतर त्यांनी काठीचा आधार घ्यायला सुरूवात केली. पण त्यांच्या काठीवर नक्षीकाम आणि काठ्यांचं कलेक्शनही तसंच स्टाईलिश होतं.बाबासाहेबांनी अनेकदा भावूक होऊन सांगितलं होतं की, न्हावी पैसे घेऊन सुद्धा त्यांचे केस कापत नसे. त्यांची बहिणच त्यांचे केस कापून देई. परंतू बाबासाहेबांनी कधी वाढलेले केस, दाढी असा अवतार ठेवला नाही. क्लिन शेव्ह्ड असायचे ते. बाबासाहेबांचं राजबिंड रुप खुलून दिसायचं. त्यांना उद्धारकर्ता, बाप या भावनेतून पाहील्यानं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं असं आकलन करण्याला आपण वावच ऊरू दिला नाही. सेम केस तात्यासाहेब फुल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. त्यांचंही स्टाईल स्टेटमेंट असंच अफाट होतं. तर दोस्तहो थोडक्यात काय तर... कुणीही कधी तुम्हाला म्हटलं की एवढं लॅविश का राहता? हे असं सोनं नाणं का घालता? हे असलं उंची का जेवता ? तर एवढंच सांगा.. आमच्यात हे असंच करतात.. असंच खातात.. असेच कपडे घालतात. आपल्या शेकडो पिढ्या बिनकपड्यांच्या हिंडल्यात. एक सितारा जन्माला आला अन् त्यानं सारं काही पालटून टाकलं. जे घालाल ते चांगलंच घाला. भारीच घाला. आपलं सौंदर्यशास्त्र ठासून सांगा, दाखवा अन् मिरवा ही. याला भले ते निर्लज्ज प्रदर्शन म्हणोत तर म्हणूदे.. मेहनतीच्या कमाईने आलेल्या वस्तूला निर्लज्जपणा म्हणत नाहीत. स्वाभिमान म्हणतात.

No comments:

Post a Comment